माय
अशी कशी आता सारी झाडे ओसाडली
रान सारे ओके बोके अवकळा आली ।।धृ।।
झोंबणारा वारा आता तापुनिया सारा
फिरे गरगरा करी धरा वर-खाली.......।।१।।
लाहिवानी तापलेल्या बोचऱ्या तिरांनी
भासे जणू शृष्टी सारी उभ्याउभ्या मेली.......।।२।।
कुठे चिव, काव नाही पाखरांचा थारा
जणू सारी दूर, रान सोडूनिया गेली.......।।३।।
मुकी वानरे बिचारी हुंकार ना उड्या
सुक्या ओढ्यातिरी सारी झुरत बसली.......।।४।।
पेटत्या उन्हात सुटे घोंगावत वारा
डोळे चुरचुरे मिटे, धारा येती खाली.......।।५।।
जाळ ओके सोळा कळी जळे वाळू-माती
ओक्या बोक्या रानी फिरे शोधाया साऊली.......।।६।।
झाडा-झुडूपात शिरे हातातला विरा
तहानेली काया उभ्या घामानं भिजली.......।।७।।
उपाशी तापाशी अनवाणी मोळीसाठी
उभ्या उन्हामध्ये "माझी माय " रानी गेली.......।।८।।
Comments
Post a Comment